Saturday, September 8, 2007
दिक्षितांचा बंब
भर रात्रीचे आठ वाजलेले. आमच्या इथे दोन दिवसांपासुन वीजपुरवठा नव्हता. चोहिकडे दाट अंधार. इतका अंधार की काजव्यांनाही समोरचे काही दिसत नव्हते. घरासमोरच्या गटारातील बेडकं जेवण आटोपुन शाळेतील प्रार्थना म्हणावी तशी एका सुरात राग शुद्ध सारंग गात होती. घरातली सगळी मंडळी बाहेर वाय्रावर(घरासमोरच्या कट्ट्यावर) बसलेली. आमचे शेजारी, दिक्षितही त्यांच्या घराच्या दारात सिगारेट तोंडात धरुन प्राणायाम करत बसले होते. शेजारी त्यांची सहा वर्षाची नुकतीच पहिलीत जावू लागलेली मुलगी न दिसणाय्रा अंधारात स्वतःशीच लपंडाव खेळत होती. माळरानात घर, चोरांची भीती म्हणून आणि बायकोचा राग कोणावरतरी काढता यावा म्हणून दिक्षितांनी शारु आणि सल्लु नावाची दोन भली मोट्ठी कुत्री पाळलेली. दिक्षित रोज सकाळी उठल्या उठल्या त्यांना एकतरी लाथ घालतच. लाइट गेल्याने टि.व्हि. बघायचे सोडुन दिक्षितांच्या दोन्ही कुत्र्यांनी खुशाल ताणुन दिलेली. तितक्यात काळाचा आघात झाला. अंधारात दिक्षितांना कसलीतरी धुसफुस ऐकू आली. दिक्षितांना त्यांच्या पाणी तापवण्याच्या बंबाशेजारी दोन काळ्या आकृत्या दिसल्या. तेवढ्यात दिक्षित ओरडले, शारु सल्लु, छु छु.... त्या आवाजाने शारु दचकुन जागा झाला. मोठ्या रागाने शारुने दिक्षितांकडे बघितले आणि "काय म्हातारं चळलंय" अशा आविर्भावात त्याने एक मोट्टी जांभई दिली आणि परत मान खाली टाकली. दिक्षितांनी पटकन बंबाकडे धाव घेतली. पण तेवढ्यात चोरट्यांनी बंब घेऊन पळ काढला. दिक्षितांनी "चोर चोर" अशी आरोळी ठोकली. तोपर्यंत चोर अंधारात दिसेनासे झाले. संपुर्ण गाव तिथे गोळा झाला, पण व्यर्थ, चोरांनी आपला कार्यभाग आधीच उरकला होता. दिक्षितांच्या भार्या काहीतरी निमित्त काढुन माहेरी गेलेल्या. आता त्या परत आल्यावर त्यांना काय सांगावं या चिंतेने दिक्षितांना ग्रासले. दिक्षितांच्या सासय्रांनी मुलीसाठी तिच्या लग्नात भेट म्हणून दिलेला बंब चोरट्यांनी चक्क दिक्षितांच्या डोळ्यासमोर लंपास केला. दिक्षितांचा चेहरा जणु शाळेत वॉटरबॅग हरवून आलेल्या लहान मुलासारखा झाला... कसली कसली दु:खं असतात माणसाला नाही?
Subscribe to:
Posts (Atom)